सोमवार, १७ जानेवारी, २०११

सोन्याची अमेरिका'

सोन्याची अमेरिका'
  अमेरिकेने 2006 मध्ये 242 टन सोन्याचे उत्पादन केले. तुलनाच करायची झाली तर, भारताचे सोन्याचे उत्पादन त्या वेळी 2.6 टन एवढे होते! यातील 80 टक्के उत्पादन नेवाडा या राज्यात होते. सोन्यामध्ये स्वयंपूर्ण असलेला हा देश सोन्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात करतो. सोन्याच्या दागिन्यांच्या खपात अमेरिकेचा जगात दुसरा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक अर्थातच भारताचा! एकूणच अमेरिकेतील "सोने प्रकरण' गमतीदार आहे. त्यावर हा ओझरता झोत...

तारीख 24 जानेवारी 1848. उत्तर कॅलिफोर्नियातल्या "अमेरिकन' नदीजवळ लाकडाचा कारखाना उभारण्याचं काम सुरू होतं. जेम्स मार्शलला नदीत काहीतरी चकाकताना दिसलं. धडधडत्या हृदयानं त्यानं तो तुकडा हातात घेतला आणि त्याची लगेचच खात्रा पटली : ते सोनंच होतं! मार्शल आणि त्याच्या कामगारांनी थोडा वेळ जल्लोष करून पुन्हा कामाला सुरवात केली; पण त्यांना काम करता करता अधिकाधिक सोनं सापडू लागलं. त्यानंतर पुढे जे घडलं, ते इतिहासात "गोल्ड रश' म्हणून जगप्रसिद्ध आहे. या सोन्याच्या शोधाचा अमेरिकन इतिहासावर अतिशय मोठा परिणाम झाला. नुसत्या अमेरिकेतूनच नव्हे; तर अमेरिकेबाहेरील दक्षिण अमेरिका, चीन, मेक्सिको, आयर्लंड, जर्मनी, फ्रान्स, तुर्कस्तान इत्यादी देशांतून कॅलिफोर्नियाकडे लोक सोन्याच्या शोधात येऊ लागले. सॅन फ्रान्सिस्को शहरानं बाळसं धरलं. कॅलिफोर्नियाच्या अर्थव्यवस्थेचा आणि पर्यायाने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा वेगानं विकास होऊ लागला. रस्ते, लोहमार्ग बांधण्यात आले. आजच्या श्रीमंत महासत्तेचा पाया अशा सोन्याच्या अकस्मात शोधामुळे 1848 ते 1855 मध्ये घातला गेला.

आज दक्षिण आफ्रिका, चीन आणि ऑस्ट्रेलियानंतर अमेरिका हा जगातील चौथ्या क्रमांकाचा सोने उत्पादक देश आहे. "ब्रिटिश जिऑलॉजिकल सर्व्हे'नुसार अमेरिकेने 2006 मध्ये 242 टन सोन्याचे उत्पादन केले. तुलनाच करायची झाली तर, भारताचे सोने उत्पादन त्या वेळी 2.6 टन एवढे होते! यातील 80 टक्के उत्पादन आज, जिथे लास वेगास आहे त्या नेवाडा या राज्यात होते. सोन्यामध्ये स्वयंपूर्ण असलेला हा देश सोन्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात करतो. सोन्याच्या दागिन्यांच्या खपात अमेरिकेचा जगात दुसरा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक लागतो अर्थातच भारताचा!

कॅरेटपेक्षा दागिना खुलणे महत्त्वाचे
अमेरिकेच्या इतिहासात असामान्य स्थान असलेलं हे सोनं आज अमेरिकन माणसाच्या आयुष्यात भारतीयांइतकं महत्त्वाचं मानलं जात नाही. सर्वसामान्य मध्यमवर्गीय अमेरिकन माणसाकडं अतिशय थोड्या प्रमाणात सोन्याचे दागिने असतात. अनेकांकडे; विशेषत: पुरुषांकडे तर कुठल्याही प्रकारचे सोन्याचे दागिने नसतात. भारतीय संस्कृतीत जे स्थान मंगळसूत्राचं आहे, तेच अमेरिकन संस्कृतीत "वेडिंग रिंग'चं आहे; परंतु उच्चमध्यमवर्गात ही रिंग सोन्यापेक्षा हिऱ्याची असणं प्रतिष्ठेचं मानलं जातं. अमेरिकेतले सोन्याचे बहुतेक दागिने हे 24 कॅरेटचे नसतात- ते 14 अथवा 18 कॅरेटचे असतात. अमेरिकन स्त्री जेव्हा एखादा दागिना खरेदी करते, तेव्हा ती तो दागिना 14 कॅरेटचा आहे की 24 कॅरेटचा, याचा अजिबात विचार करत नाही. तो दागिना आपल्याला कसा दिसेल याचाच, फक्त ती विचार करते! एखादा चांदीचा दागिना जर सोन्याच्या दागिन्यापेक्षा चांगला दिसत असेल तर तो सोन्याचा दागिन्याऐवजी चांदीचा दागिना घ्यायला ती मुळीच कचरणार नाही.

चांदीसुद्धा सोन्याच्याच मोलाची
अमेरिकेत चांदीला सोन्याच्या तुलनेत भारताएवढं कनिष्ठ समजलं जात नाही. किंबहुना बऱ्याच वेळा अमेरिकन लोकं चंदेरी दिसणाऱ्या पांढऱ्या सोन्याचे दागिने खरेदी करतात! सोन्यात पॅलाडियम, निकेल किंवा तांबे मिसळून पांढऱ्या रंगाचं सोनं तयार करता येतं. अमेरिकन माणूस भारतीयांप्रमाणं सोन्याकडं गुंतवणूक म्हणून पाहत नाही. त्याला सर्वसामान्य भारतीयाप्रमाणे सोन्याचे भाव माहीत नसतात. अमेरिकन समाजात दागिन्यांचं महत्त्व असलं तरी ते सोन्याचेच हवेत, असा अट्टहास नसतो. किंबहुना बऱ्याच वेळा चांदी, पांढरे सोने, हिरे आणि प्लॅटिनम यांना प्राधान्य दिलं जातं. इथल्या लग्नकार्यात किंवा इतर कुठल्याही कार्यात सोन्याची देवघेव (सोने म्हणून; दागिने म्हणून नव्हे) अथवा वापर झालेला मी पाहिलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य अमेरिकन माणसावर सोन्याच्या भावाच्या चढ-उताराचा फारसा परिणाम होत नाही. एकंदरीतच अमेरिकन समाजात भारताच्या तुलनेत सोन्याविषयी एक प्रकारची अनास्था आढळते.

हिप हॉपर्समध्ये स्टेटस सिंबॉल
अमेरिकन कृष्णवर्णीयांतील एका घटकाला मात्र सोन्याविषयी अप्रूप आहे. 1970च्या दशकात न्यूयॉर्कमधील कृष्णवर्णीयांत हिप हॉप संगीताचा जन्म झाला. या संगीताचा पुढे विस्तार होऊन एक प्रकारची हिप हॉप संस्कृतीच तयार झाली. या संस्कृतीत वाढलेली मुले त्यांच्या पेहरावावरून चटकन ओळखू येतात. उलटी किंवा आडवी टोपी घालणे, ढगळ पॅंट, ढगळ शर्ट आणि त्यावर सोन्याची चेन! हिप हॉपर्समध्ये सोन्याची चेन घालणे हे स्टेटस सिंबॉल मानले जाते. जेवढी मोठी व जड चेन तेवढा तो मनुष्य मोठा! वेगवेगळ्या आकाराच्या, मध्ये अनेक प्रकारची चिन्हे लटकवलेल्या हिप हॉप पद्धतीच्या सोन्याच्या साखळ्या अमेरिकेत सर्वत्र मिळतात. अर्थातच, सर्वसामान्य हिप हॉपर्स नुसत्या सोनेरी रंगाच्या खोट्या साखळ्या घालतात व वरच्या वर्गातील लोक खरंखुरं सोनं वापरतात; पण जे लोक खरं सोनं वापरतात, त्यांच्याही साखळ्या 14 किंवा 18 कॅरेटच्या असतात. भारतीयांसारखा 24 कॅरेटचा अट्टहास नसतो.

पुण्याची पेढी अमेरिकेत
अमेरिकेतल्या अजून एक घटकाला सोन्याविषयी विशेष प्रेम आहे आणि ते म्हणजे भारतीय! भारतीय लोक जगात कुठेही गेले तरी काही गोष्टी बदलत नाहीत. सोन्याचा ध्यास ही त्यातलीच एक गोष्ट. अमेरिकेतल्या जवळजवळ सगळ्या मोठ्या शहरांमध्ये एक भारतीय रस्ता असतो. या रस्त्यांवर सगळ्या भारतीय वस्तूंची दुकाने व भारतीय उपाहारगृहे असतात. अर्थातच, या रस्त्यांवर भारतीय सोन्याच्या पेढ्याही असतात. अलीकडेच काही मराठी पेढ्यांनीही अमेरिकन बाजारपेठेत पाऊल टाकले आहे. पु. ना. गाडगीळ यांच्या "पीएनजी ज्वेलर्स'ने भारतीय बहुसंख्य असलेल्या सॅन फ्रान्सिस्को-बे एरियात आपले दुकान थाटले आहे. भारतीयांच्या या सोन्याच्या ध्यासाचा एक मजेशीर परिणाम अलीकडेच माझ्या पाहण्यात आला. माझा मित्र विशाल लॉस एंजेलिसच्या उपनगरातील व्हॅनोव्हन स्ट्रीटवर राहतो. त्याच्याच घराजवळ जवळजवळ पंधरा भारतीयांचे बंगले आहेत. अलीकडेच त्याच्या घरात चोरी झाली. महागडा लॅपटॉप, स्टिरिओ इत्यादी उपकरणांना चोरांनी हातही लावला नाही; परंतु घरातले सगळे सोने मात्र लंपास केले! विशालने ही गोष्ट जेव्हा आपल्या भारतीय शेजाऱ्याला सांगितली, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर अजिबात आश्चर्य उमटले नाही. उलट त्यानेच विशालला सांगितले, की इथल्या प्रत्येक भारतीयाकडे सोन्याची चोरी झालेली आहे. अमेरिकन चोरांनाही भारतीयांकडे 24 कॅरेटचे सोने असते, हे ठाऊक आहे!

अमेरिकींनो, सोने विकत घ्या!
जिम क्रेमर सीएनबीसीवर (अमेरिका) "मॅड मनी' नावाची प्रसिद्ध मालिका सादर करतात. न्यूयॉर्कमधल्या एका प्रतिष्ठित लोकांच्या निधी-संकलनाच्या कार्यक्रमात त्यांनी, "किती लोकांनी सोन्यात पैसे गुंतवले आहेत?' अशी विचारणा केली. त्यावर 200 पैकी फक्त 4 लोकांकडेच सोनं असल्याचं त्यांना कळलं! त्यानंतर सोने खरेदी करण्याचा सल्ला आपल्या मालिकेच्या माध्यमातून त्यांनी लोकांना दिला. त्यांच्या मते जगातील अनेक देश निर्यात वाढवण्यासाठी आपल्या चलनाची किंमत कमी करीत आहेत. त्यामुळे जगातील महत्त्वाच्या चलनाची किंमत कमी होईल; परंतु सोन्याची किंमत मात्र वाढतच राहील. जिम क्रेमर ही सोनेखरेदीचा सल्ला देणारी एकमेव व्यक्ती नाही. अमेरिकेतील अनेक गुंतवणूक सल्लागार लोकांना सोनेखरेदीचा सल्ला आपापल्या ब्लॉगमधून आणि वेबसाइटवरून देत असतात; पण कितीही समजावलं तरी त्याचा अमेरिकन लोकांवर फारसा परिणाम होत नाही. बहुधा भारतीयांत आढळणाऱ्या कुठल्या तरी सोनेरी जनुकाचा (जीन्सचा) अमेरिकन माणसांत अभाव असावा!
·    सोन्याच्या दागिन्यांच्या खपात अमेरिका दुसरी; पहिला अर्थात भारत!
·    सोन्याचं भारतीयांइतकं महत्त्व अमेरिकी माणसाला नाही.
·    मध्यमवर्गीय अमेरिकी माणसांकडे सोन्याचे दागिने अत्यल्प.
·    पुरुषांना सोन्याच्या कुठल्याच दागिन्यांचे आकर्षण नाही.
·    वेडिंग रिंग सोन्याची नव्हे; तर हिऱ्याची असणे प्रतिष्ठेचे.
·    अमेरिकेतील सोन्याचे दागिने 24 नव्हे; तर 14 किंवा 18 कॅरेटचे.
·    अमेरिकन स्त्री दागिना खुलून दिसेल की नाही, याचा विचार करते; तो किती कॅरेटचा, याचा नव्हे!
·    वेळप्रसंगी सोन्यापेक्षा चांदीच्या दागिन्यालाही प्राधान्य. सोन्याच्या दागिन्यांचा अट्टहास नाही.
·    सोन्याच्या तुलनेत चांदीला कनिष्ठ समजण्याचा प्रकार अमेरिकेत नाही.
·    अमेरिकी माणूस सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहत नाही. सोन्याचे दरही त्याला अनेकदा माहीत नसतात.
·    सोन्याच्या दराच्या चढ-उताराचा परिणाम सर्वसामान्य अमेरिकी माणसावर होत नाही.
·    चंदेरी दिसणाऱ्या पांढऱ्या सोन्याचे दागिने खरेदी करण्यास प्राधान्य. सोन्यात पॅलाडियम, निकेल किंवा तांबे मिसळून तयार होते पांढऱ्या रंगाचे सोने.
·    एकंदरीत अमेरिकी समाजात भारताच्या तुलनेत सोन्याविषयी अनास्था.    संबंधित बातम्या
·    'पीएनजी'चा अमेरिकेतील दुसरा वर्षपूर्ती सोहळा
 
   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा