सोमवार, १७ जानेवारी, २०११

आम्ही युवक

आम्ही युवक

12 जानेवारी- राष्ट्रिय युवा दिन. तरुणांना, "ते तरुण आहेत' याची जाणीव करुन देणारा दिवस. आपण जगत असतानाची प्रत्येक अवस्था खरं तर फार सुंदर असते. लहानपणची निरागसता ते वृद्धावस्थेतील प्रगल्भता असा आपला प्रवास सुरुच असतो. पण यातही तारुण्य विशेष महत्त्वाचं! कारण याच काळात आपण आपल्यातल्या "स्व'ला ओळखण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला जे आवडतं तेच करण्याचा अट्टाहास आपण करत असतो. कितीही अवघड प्रसंग आले तरी त्यावर मात करण्याचा आपला ध्यास असतो. हीच तर तरुणाची खरी ओळख आहे. प्रसिद्धी, पैसा या गोष्टी तर आहेतच; पण स्वत:ला सिध्द करण्याचा हा काळ असतो. एवढ्या मोठ्या जगात, इतक्‍या माणसांमध्ये लोकांना आपला चेहरा लक्षात रहावा यासाठी आपली धडपड सुरु असते.

पण "तारुण्य' म्हणजे फक्त हेच नाही. "आपण तरुण आहोत' म्हणजे काय आहोत, काय काय करु शकतो, हे जरी आपल्याला कळलं तरी बरंच काही करण्यासारखं आहे हे कळेल. तारुण्य म्हणजे उत्साह, तारुण्य म्हणजे चैतन्य, तारुण्य म्हणजे महत्त्वाकांक्षा! तारुण्याला कशाचीही उपमा दिली तरी काहीतरी कमी असल्यासारखं वाटेलच.

आपल्या प्रतिभेला कोणत्याही बंधनात न अडकवता मुक्तपणे त्याची उधळण करावी, आपल्या सर्व जाणीवा प्रगल्भ कराव्यात, जेवढं काही शिकता येईल, जेवढं काही चांगलं करता येईल ते करावं अशी उर्मी याच वयात तर प्रबळ असते.

खरं तर "वय' हा काही तरुणपण ठरवण्याचा योग्य मापदंड नाही. आपण मनाने किती तरुण आहोत, हे महत्त्वाचं! न थकता, न कंटाळता नव्यानं आयुष्य जगण्याची इच्छा आपल्याला होत असली की आपण तरुणच आहोत, हे समजावं. आता तारुण्याची किती व्याख्या सांगायच्या? तरीही ती व्याख्या प्रत्येकाची त्याच्या त्याच्या स्वभावानुसार वेगळीच असणार. तरीही, अमित सामर्थ्याने आणि दुर्दम्य महत्त्वाकांक्षेने भव्य-दिव्य स्वप्नं साकार करण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येकाच्या व्याख्येतले शब्द जरी वेगळे असले, तरी अर्थ मात्र एकच असतो. हे साध्य करण्यासाठी आधी आपला स्वभाव ओळखून आयुष्याची दिशा ठरवायला हवी. आणि एकदा दिशा ठरवली की त्या मार्गाने भक्कम पावले टाकायला सुरवात करायची. आपल्या मनात अनेक गोष्टी असतात. त्या आपल्याला करायच्याही असतात. पण आज करु, उद्या करु यात त्या गोष्टी करायच्याच राहून जातात. आणि मग नंतर आपण सांगतो की," अरे मला हे शिकायचं होतं, पण वेळच मिळाला नाही, कामच खूप होतं,' वगैरे वगैरे... समजा, जर मला तबला शिकायचाय किंवा हॉर्स रायडिंग शिकायचंय तर वाट कशाला पाहा? लगेच शिकू की ती गोष्ट! कोणत्याही गोष्टीला उशीर नको. कारण याच वयात अनेक गोष्टी करण्याची मानसिक आणि शारीरिक ताकद असते. म्हणूनच तरुणपण महत्त्वाचं!

या तरुणाईचे रंग अनेक आहेत. आशेचा, निराशेचा, प्रेमाचा, ध्येयाचा, आकांक्षेचा...! या सर्व रंगांमध्ये आपण कशाप्रकारे रंगतो यावर बरेच काही अवलंबून आहे. आणि म्हणूनच आपल्यावर, आपल्या स्वप्नांवर आपण समाजाचंही भविष्य घडवू शकतो. काहीतरी चांगलं होण्याची आशाच आपल्याला कार्यप्रवण करते, तर कधीतरी आलेली निराशा इतर लोकांचं खरं रुप आपल्याला दाखवते. प्रेमाचा गुलाबी रंग आपल्या प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. त्याच गुलाबी रंगात गुरफटल्यामुळे मुली झिरो फिगरच्या मागे लागतात तर मुलं हिरो बनण्यासाठी जिममध्ये झिजतात. आरोग्यवगैरे त्यानंतरच्या गोष्टी! ध्येयाचा आणि महत्त्वाकांक्षेच्या बळावर तर आपण खऱ्या अर्थाने जगत असतो. असे अनेक रंग आपलं आयुष्य कळत-नकळतपणे घडवत असतात. आपण ते जर डोळसपणे पाहिलं तर त्यात जास्त मजा आहे.

वयानुरुप आलेलं तारुण्य एकदाच येतं. त्या काळात काय काय करायचं? प्रत्येकानं आपल्या मनासारखं वागावं (अर्थात इतरांना त्रास होऊ न देता!), आपल्यातली सर्व शक्ती, सगळी प्रतिभा, सगळी ऊर्जा यांची स्वच्छंदपणे उधळण करावी. याचबरोबर आपल्यावर असणाऱ्या जबाबदारीचेही भान असावं. कारण जबाबदारीच आपल्याला वास्तवता शिकवते. आपण युवक आहोत आणि आपल्याकडे जे काही चांगलं आहे, ते इतरांना देण्याचीही ताकद आपण बाळगून आहोत. हे लक्षात ठेवून जर आपण स्वत:लाच शोधायचा प्रयत्न केला तरच आपण नवनिर्मितीची स्वप्नं पाहू शकतो.

म्हणूनच या "युवा दिना'च्या निमित्ताने आपण आपल्या मनाशी काही ठाम निश्‍चय करु की जेणेकरुन आपलं आयुष्य अधिक सुंदर होईल. मिळालेल्या तारुण्याचा पुरेपूर उपभोग घेण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे. बाकी मजा, मस्ती अशा गोष्टी तर आहेतच. त्या आत्ताच करायच्या नाहीतर मग कधी? चला तर मग, काहीतरी चांगलं करुन दाखवूच. नुसतं बोलून काय होणार आहे?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा