सोमवार, १७ जानेवारी, २०११

सुसाट गर्ल्स

सुसाट गर्ल्स
     
एकदम भारीतल्या पॉवर बाईकवरून लेदर जॅकेट, ग्लोव्हज, स्टाइलिश हेल्मेट, ग्लॅडिएटर गॉगल घालून दमदार एन्ट्री... बाईक थांबवल्यावर एक-दोनदा ऍक्‍सलेटर रेझ करून, सिंहाच्या डरकाळीप्रमाणे आवाज काढून गाडी बंद... त्यानंतर स्लो मोशनमध्ये हेल्मेट काढून स्मितहास्य- थोडक्‍यात माज... अशी ठरलेली हिरोची एन्ट्री आपल्या सगळ्यांच्याच डोक्‍यामध्ये फिट्ट बसली आहे.

"लेकिन यहां पे पिक्‍चर में थोडा चेंज होने का...' इथे आता खुरटी दाढी असलेल्या हिरोच्या ऐवजी मुलगी किंवा बाई आणा. लवकर इमॅजिन होत नाही. सहाजिकच आहे म्हणा आणि इमॅजिन झालं तरी सहन होत नाही.

मुलगी बाईक चालवतीये म्हटलं, की अजूनही आपल्या भुवया उंचावतात. त्यात स्टंट करणं म्हणजे जरा अतीच! पॉवर बाईक, लेदर जॅकेट, ग्लोव्हज, स्टाइलिश हेल्मेट ही सगळी मुलांची मक्तेदारी! हे सगळं आणि मुलगी हे कॉम्बिनेशन डोळ्यांसमोर येतच नाही. याची सवय आता निदान पुण्यातल्या लोकांनी तरी करून घ्यायला पाहिजे; कारण भारतातील पहिला "स्टंट रायडर्स गर्ल्स' ग्रुप आपल्या पुण्यात आहे. पुण्यात एकमेव असलेला हा ग्रुप 2006 मध्ये तयार झाला. हा ग्रुप फक्त हौशी बाईक रायडिंगच करत नाही, तर निरनिराळे चित्तवेधक स्टंट्‌सही करतो. थोडक्‍यात काय, यांनी मुलांची याही क्षेत्रातील मक्तेदारी मोडून काढलीय.

या स्टंट रायडर ग्रुपची फाउंडर मेंबर असलेली प्रिया पाटील म्हणते, ""लहानपणापासूनच मला बाइकिंगची खूप क्रेझ होती. माझ्या ऍक्‍टिव्हावर प्रॅक्‍टिस करताना मी व्हीली करणं, तशीच होल्ड करणं, असे काही स्टंट करायला लागले.'' अशीच आवड असणाऱ्या मुली तिला पुण्यातच मिळाल्यावर त्यांनी हा ग्रुप फॉर्म केला. आठवड्यातून एक दिवस भेटून त्या वेगवेगळ्या स्टंट्‌सची प्रॅक्‍टिस करतात. नीट तयारी झाल्यावर यातील काही मुलींनी "स्पीड रन' या प्रतिष्ठित स्पर्धेत भागही घेतला. तसंच या ग्रुपनं "स्टंट मेनिया' या रिऍलिटी शोमध्येही भाग घेतला.

त्यामुळे त्यांचं खूप कौतुकही झालं. ""बाईकचं फॅसिनेशन फक्त मुलांनाच असतं हा समज चुकीचा आहे. मुलींनाही तेवढंच फॅसिनेशन असतं.'' असं यात भाग घेतलेल्या सॉफ्टीनं सांगितलं. तिनं मुंबईच्या सीपीएए या एनजीओनं आयोजित केलेल्या अँटी टोबॅको राइडमध्ये भाग घेतला होता. त्या अंतर्गत तिनं 12 दिवसांत 12 शहरांना भेट देऊन तब्बल 7000 किलोमीटर अंतर पार केलं. ती सध्या बाइकवरून लडाखला जायचं प्लॅनिंग करत आहे.

हे स्टंट करत असताना अपघातही होतात; पण पडणार नाही ती बायकर कसली? ""पडलं तर काय होईल, हा विचार माझ्या मनात कधी आलाच नाही. तो एक शिकण्याचाच एक भाग आहे,'' असं प्रिया पाटील आवर्जून सांगते. एकदा मुग्धा चौधरी बाईक 90 डिग्रीमध्ये कॉप व्हीली करून ती होल्ड करण्याच्या प्रयत्नांत पडली. तिच्या कॉलर बोनला दुखापत झाली; पण ती थांबली नाही. ती हसून म्हणते, ""चांगलं शिकण्यासाठी एक-दोन वेळा पडायलाच लागतं; पण त्यामुळे भीती वाटत नाही. उलट अजून प्रॅक्‍टिस करण्याचा इंटरेस्ट वाढतो.'' आता या सगळ्या मुली पुढच्या स्पीड रनसाठी कसून तयारी करत आहेत.

सो गाइज, आता बाइकवर सुसाट सुटलेली मुलगी पाहून तोंड वाकडं करू नका, नाहीतर गाडी थेट तुमच्यावरच व्हीली मारेल!

"बाईकचं फॅसिनेशन फक्त मुलांनाच असतं, हा अगदी चुकीचा समज आहे. आम्हा मुलींनाही तेवढंच फॅसिनेशन असतं!'

"लहानपणापासून मला बाईकिंगची खूप क्रेझ होती. सुरवातीला मी माझ्या ऍक्‍टिव्हावर प्रॅक्‍टिस सुरू केली. ऍक्‍टिव्हा व्हीली करणं, तशीच होल्ड करणं, असे स्टंटचे प्रकार मी करू लागले.'

"पडलं तर काय होईल, हा विचार माझ्या कधी मनातच आला नाही. तो एक शिकण्याचाच भाग आहे!'

"चांगलं शिकण्यासाठी एक-दोन वेळा पडायलाच लागतं; पण त्यामुळे भीती वाटत नाही. उलट अजून प्रॅक्‍टिस करायचा इंटरेस्ट वाढतो.'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा