गडद रात्र आणि त्यात मुसळधार पाऊस. सारा आसमंतात रातकीडयांच्या किर्र असा आवाज घुमत होता . एका बंगल्याच्या शेजारच्या झाडावर पाण्याने भीजलेले एक घूबड बसले होते . त्याची भिरभीरती भेदक नजर समोरच्या बंगल्याच्या एका आतून प्रकाश येत असलेल्या खिडकीवर खिळून थांबली . घरात त्या खिडकीतून दिसणारा तो एक लाईट सोडून सर्व लाईट्स बंद होते. अचानक तिथे त्या खिडकीजवळ आसऱ्यासाठी बसलेल्या कबुतरांचा झुंड च्या झुंड तिथून फडफड करीत उडून गेला. कदाचित तिथे एखाद्या अदृष्य शक्तीचं अस्तीत्व त्या कबुतरांना जाणवलं असावं. खिडकीचे काच पांढऱ्या रंगाचे असल्यामुळे बाहेरुन आतलं काहीच दिसत नव्हतं. खरचं तिथे काही अदृष्य शक्ती पोहोचली होती का? आणि पोहोचली होती तर तिला आत जायचे होते का? पण खिडकीतर आतून बंद होती.
बेडरुममध्ये बेडवर कुणीतरी झोपलेले होते. त्या बेडवर झोपलेल्या आकृतीने कड बदलला आणि त्या आकृतीचा चेहरा दुसऱ्या बाजूला झाला. त्यामुळे कोण होतं ते ओळखनं कठीण होतं. बेडच्या बाजुला एक चष्मा ठेवलेला होता. कदाचीत जे कुणी झोपलेलं होतं त्याने झोपण्याआधी आपला चष्मा काढून बाजुला ठेवला असावा. बेडरुममध्ये सगळीकडे मद्याच्या बाटल्या, मद्याचे ग्लासेस, वर्तमान पत्रे, मासिके इत्यादी सामान अस्तव्यस्त इकडे तिकडे पसरलेलं होतं. बेडरुमचे दार आतून बंद होते आणि त्याला आतून लॅच लावलेला होता. बेडरुमची एकुलती एक खिडकी तिही आतून बंद केलेली होती - कारण ती एक एसी रुम होती. जी आकृती बेडवर झोपलेली होती तिने पुन्हा आपला कड बदलला आणि आता त्या आकृतीचा चेहरा दिसायला लागला. स्टीव्हन स्मीथ, वय साधारण पंचविस-सव्वीस, सडपातळ बांधा, चेहऱ्यावर कुठे कुठे दाढीचे खुंट आलेले, डोळ्याभोवती चश्म्यामुळे तयार झालेली काळी वतृळं. काहीतरी हळू हळू स्टीव्हनपाशी जायला लागलं. अचानक झोपेतही स्टीव्हनला चाहूल लागली आणि तो दचकुन जागा झाला. त्याच्या समोर जे काही होतं ते त्याच्यावर हल्ला करण्याच्या पावित्र्यात असल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर भीती पसरली, सर्वांगाला घाम फुटला. तो प्रतिकार करण्याच्या उद्देशाने उठू लागला. पण तो प्रतिकार करण्याच्या आधीच त्याने त्याच्यावर, आपल्या सावजावर झडप घातली होती. सगळ्या आसमंतात स्टीव्हनच्या एका मोठ्या आगतीक, भयावह किंकाळीचा आवाज घुमला. आणि मग सगळीकडे शांतताच शांतता पसरली .. अगदी पुर्ववत...
क्रमश:...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा