सोमवार, १७ जानेवारी, २०११

हसा

हास की!


हा ऽ ऽ ऽ हा ऽ ऽ ऽ...हा....
ही ऽ ऽ ऽ ही ऽ ऽ ऽ ही....
काय?

अरे काय झालं म्हणून काय विचारतोस? हसतोय....
कशाला? आयला... मला वाटलं म्हणून! तू पण हास की!

हे धकाधकीचं की काय म्हणतात ते जीवनबीवन सुरू झाल्यापासून काही लोक "हसणे' हा छंद म्हणून आवडीने जोपासायला लागलीएत. शिवाय, "इथं मरायला वेळ नाही, हसणार कुठून?' हा प्रश्‍न असतोच. एवढे काय वैतागलेत लोक?

आपल्याला तर हसायला खूप आवडतं. मी तर हसायला कारणंच शोधत असतो अन्‌ कधी कधी तर कारणाचीही गरज पडत नाही. आता याला कुणी "वेड लागलंय' म्हणेल, कुणी "दुसरे काही काम नाही का?' म्हणेल. पण मला काही फरक पडत नाही. कारण त्या हसण्याने मला जी उर्जा मिळते, त्याला तोड नाही.

मनापासून हसायला कोणत्या प्रशिक्षणाची गरज पडतच नाही. हसरं मन आणि हसरा स्वभाव असला की झालं काम! आता, मी काय इथे "हसायचे कसे, का आणि केव्हा?' यावर प्रवचन वगैरेसारखी भंकस करणार नाहीए. पण येता-जाता, लोकांकडे बघताना, बोलताना सारखं जाणवत राहतं, की काहीतरी missing आहे. आजकाल लोक हसायलाच विसरलीएत की काय, अशी शंका येतेय. मग अशा विषयावर आम्ही मित्र जेव्हा चर्चा करतो, (हसणारे लोक गंभीर नसतात हा गैरसमज दूर करा, काय?) तेव्हा लोकांच्या वृत्तीतच बदल झालेला दिसून येतो. माझ्या ओळखीचा भूषण नावाचा एक चांगला फोटोग्राफर आहे. त्याचं observation असं आहे, की लोकांकडे जसजसा पैसा येत जातो, तसं त्यांचं हसणंही खूप reserved होत जातं. हसा म्हटलं की बळजबरीने ओठ हलतात. दात तर दिसतच नाहीत. हसल्यामुळे आपलं प्रेस्टिज कमी होईल की काय, अशी भीती बहुतेक लोकांना वाटतीय.

खरं तर, "हसणे' हा एक आरोग्यदायी रोग आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. या रोगाची लागण होतेच. आता बघा, सारसबाग, जॉगर्स पार्क किंवा अजून कुठेही "हास्यक्‍लब' चालू असतात. अनेक माणसं तिथे कृत्रिम हास्य करत असतात. आपण त्यांच्याकडे दोन मिनिट जरी पाहिलं तरी आपल्याला हसू येतं. भले ते खोटं हास्य असू द्या. त्या हसण्याच्या प्रभावामुळे वातावरण बदलून जातं. कृत्रिम हास्यामुळे त्या माणसांच्या शरीरावर तर चांगला परिणाम होतोच, शिवाय ते इतर येणाऱ्या-जाणाऱ्यांनाही हसू आणतात. कृत्रिम हास्याचा एवढा प्रभाव तर नैसर्गिक, निर्मळ आणि खळाळून हसण्याचा केवढा परिणाम होईल!

आता हसायचं म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक वेळी एकमेकांच्या हातावर टाळ्या देऊन, आपापली पोटं धरून हसायला सांगत नाही. पण प्रत्येकाने आपलं हरवलेलं हास्य शोधलं पाहिजे. सगळं आजूबाजूलाच असतं. पण आपणच डोळ्यांवर झापडं लावल्याने आपण अनेक गोष्टींना मुकतो. तुम्ही कधी फूल उमलताना पाहिलं आहे का? ऋतू बदलतो तेव्हा जमिनीचा रंग बदलताना पाहिला आहे का? ज्यांना आपण निर्जीव म्हणतो, त्या गोष्टीही निसर्गाला प्रतिसाद देतात, मग आपण का आडमुठेपणा करतो? समोरच्या गोष्टीला साद घातली की प्रतिसाद येतोच. फक्त त्या वेव्हलेंग्थशी आपल्याला जुळवून घेता आलं पाहिजे.

परवाच मी दुर्गाबाईंचं "ऋतुचक्र' वाचलं. प्रत्येक ऋतूत निसर्गात घडून येणाऱ्या बदलांचं जे वर्णन दुर्गाबाईंनी केलंय, त्याला तोड नाही. पुस्तक वाचताना जणू तो ऋतूच आपल्याभोवती अवतरतो. ते पुस्तक वाचताना मला जे समाधान वाटत होतं, तो ही हसण्याचा एक प्रकार आहे. मोठमोठ्या आयटी कंपन्यांत काही काम करणारे लोक म्हणतात, की कामाचा ताण एवढा असतो, की हसणार कधी? पण कामाचा आनंदही घेता येतोच की! कचकावून काम केल्यावर जो आनंद मिळतो, तो अवर्णनीयच असतो. अर्थात, काम म्हणजे वैताग, अशीच तुमची व्याख्या असेल तर मग अवघड आहे.

आपण हसण्याचीही वर्गवारी करून टाकली आहे. नाजूक हसणं म्हणजे समजूतदारपणाचं लक्षण, दात दाखवून हसणं म्हणजे मोकळ्या स्वभावाचं लक्षण आणि खळाळून हसणं म्हणजे बालिशपणा! हे असं हसणं आणि असणं हे कधी कधी खरं असलं तरी ते तसंच असतं हे खरं नव्हे. आपण उगाचच त्या फॉर्ममध्ये अडकून पडतो, आणि उत्स्फूर्त हास्यक्षणांना मुकतो.

मैत्रीचा आनंद, कामाचा आनंद, प्रेमाचा आनंद, शांत बसण्यातलाही आनंद, निसर्गात क्षणाक्षणाला फुलणारा आनंद..... या सगळ्याचा आनंद आपण अवश्‍य लुटलाच पाहिजे. काहीतरी भुक्कड कारणं सांगून आपण आपल्या खऱ्या आयुष्यापासून पळून जातो आणि मग जो आनंद, जे हास्य गमावून खोऱ्याने पैसा कमावलेला असतो, तोच पैसा मानसिक ताण घालविणाऱ्या शिबिरांमध्ये खर्च करतो. म्हणजे जे फुकटात, सहज आणि स्वच्छ स्वरूपात उपलब्ध आहे, ते सोडून उलटा घास आपण घेत बसतो. दुर्दैवाने समाजालाही असल्याच लोकांचं जास्त कौतुक आहे. असेही लोक आहेतच, की जे स्वत:च्या हिमतीवर, कर्तृत्वावर अमाप पैसा कमावत आहेत आणि तरीही आपल्या बालपणाशी त्यांची नाळ तुटलेली नाही. म्हणूनच त्यांचं हसणं अजून टिकून आहे.

पैसा मिळाला की आनंद मिळतो, हे निखालस चूक आहे. आपण जर रस्त्याने जाताना इकडेतिकडे पाहिलं तर लहान मुलांच्या, काम करणाऱ्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहा. आपण आपलं असणं विसरतो, एवढं ते निर्मळ असतं. यावर तुम्ही म्हणाल, तुला त्यांचं दु:ख माहीत नाही. उलट माहीत आहे म्हणूनच त्यांच्या हसण्याचं मोल जास्त आहे.

आता मी तरी किती बडबड करणार आणि तुम्ही तरी किती सहन करणार! शिवाय मघाशी मीच लिहिलंय, की शांत बसण्यात आनंद असतो म्हणून! तर हाच आनंद मी तुम्हाला देतो. बाकी, देण्यातला आनंदही काही औरच असतो. शिवाय टिकाऊ आणि उत्तम प्रतीचा! तिकडे चंद्रपूरला बाबा आमटेंनी माणसांचा कुष्ठरोग बरा करून त्यांच्यात जो आनंद फुलवलाय, त्याची बीजं सर्वत्र पसरली आहेत. आपण ती शोधत नाही, रुजवत नाही. चला, शोधू या! तसं जर खरंच करता आलं तर आपणही तशी अनेक "आनंदवनं' फुलवू शकतोच की!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा